कराड - कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याची कडक अंमलबजावणी कालपासून (25 मे) सुरू झाली आहे. त्यामुळे कराडमधील मुख्य चौक आणि गल्लीबोळांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कराडकर संचारबंदीचे काटेकोर पालन करत प्रशासनाच्या निर्णयाला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराडकरांचे आभार मानले आहेत.
सर्वत्र शुकशुकाट
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण आणि वाढता मृत्यू दर पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारपासून (25 मे) 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. यापूर्वीही संचारबंदी लागू होती. परंतु, लोक विनाकारण फिरताना आढळत होते. त्यामुळे आता रूग्णसंख्या आणि मृत्यू दर कमी होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकार्यांनी नव्याने आदेश काढून कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेतील दुध विक्री वगळता सर्व काही बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन असणार याचा अंदाज कराडकरांना आला होता. पहिल्याच दिवशी संपूर्ण कराड शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मॉर्निग वॉकसाठी फिरणाऱ्यांवर कारवाई
मेडिकल, दवाखाने आणि वित्तीय संस्था वगळता सर्व आस्थापणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे कराड शहरातील चौक आणि रस्त्यांवर शुकशुकाट आहे. काही नागरीक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर दिवसभर शहरात शांतता पाहायला मिळत आहे. कडक उन्हाळा आणि नाकाबंदीमुळे कराडकर घरातच थांबत आहेत.
'नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठीच'
'कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे', असे आवाहन कराडचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्र्यांचे टूलकिटवरील ट्विट मॅनीप्युलेटिव्ह मीडिया' म्हणून टॅग करावे- काँग्रेसची ट्विटरकडे मागणी