सातारा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खटाव तालुका प्रशासनाकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. अनलॉक सुरू झाल्यापासून व्यावसायिक, नागरिक अत्यंत निष्काळजीपणे वागत आहेत. यामुळे नियम मोडणाऱ्यांवर भरारी पथक कारवाई करणार आहे.
यासाठी खटाव तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय १२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकाच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेले प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्यांवर आर्थिक दंड आणि परवाने निलंबनाची कारवाई होणार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तीन महिने कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यानंतर थांबलेले आर्थिक चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन शिथिल केले. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरु करताच प्रशासनाच्या कारभारात ढिलाई आली. तर जनताही निष्काळजीपणे वागू लागल्याचे दिसू लागले आहे. दुकानदार आणि विविध व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी सुट देण्यात आली असली तरी त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात आहे. व्यावसायिक आणि सर्वसामान्य जनतेने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. किराणा, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर अशा दुकानांमध्ये सुरुवातीला सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग , सोशल डिस्टंसिंग असे नियम पाळले जात होते. मात्र, आता सर्वत्र "आओ-जाओ घर तुम्हारा" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुकानांमध्ये जत्रा भरल्यासारखी गर्दी होत आहे.
हेही वाचा - मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे... अन् तो निघाला करोना पॉझिटिव्ह!
एकाही दुकानात सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंगची सोय नाही. हॉटेल्सना पार्सल सुविधा द्यायच्या असताना बिनधास्तपणे ग्राहकांना टेबलावर खाद्यपदार्थ दिले जात आहेत. दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्यांच्या वेळा पाळल्या जात नाहीत. सर्वसामान्य लोक तोंडावर मास्क न लावता सर्वत्र निष्काळजीपणे वावरत आहेत. परिणामी खटाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही अनेक जणांना कोरोनाची बाधा होत आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरीकडे वाटचाल करू लागला आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून अशा चुकीच्या गोष्टींना चाप बसणार आहे.