सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पै. मारूती वडार-चव्हाण मागास अर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली आहे. वडार समाज अर्थिक विकास महामंडळाला आंतरराष्ट्रीय मल्ल दिवंगत पै. मारूती वडार-चव्हाण यांचे नाव देऊन सरकारने खर्या अर्थाने वडार समाजाचा आणि पै. वडार यांच्या कुस्तीतील योगदानाचा गौरव केल्याची भावना वडार कुटुंबीय आणि बांधवांनी व्यक्त केली आहे. २४ वर्षांपूर्वी पाटणचे सुपूत्र, माथाडी नेते दिवंगत आण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महामंडळाची स्थापना झाली होती. आता वडार समाज मंडळामुळे सातार्यातील दोन सुपुत्रांचा सन्मान झाला आहे.
आण्णासाहेबांच्या नावाने महामंडळ : सेना-भाजप युती सरकारच्या काळात २७ नोव्हेेबर १९९८ रोजी आण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना झाली होती. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांसाठी स्वंयरोजगार उपलब्ध करून त्यांना सक्षम करणे, हा त्यामागील उद्देश होता. तत्कालीन सेना-भाजप युती सरकारने माथाडी नेते आण्णासाहेब पाटील यांचे महामंडळाला नाव देऊन मराठा आरक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा गौरव केला होता.
वडार समाजासाठी महामंडळाची घोषणा : वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती वडार-चव्हाण आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेची आणि महामंडळाला 50 कोटी रुपये भाग भांडवल मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. या महामंडळाच्या स्थापनेमुळे वडार समाजाच्या अर्थिक उन्नतीसह सर्वांगिण विकासाचे दार उघडले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल मारूती वडार यांनी कुस्तीचा लौकीक सातासमुद्रापार नेला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी मल्लविद्या आत्मसात केली. भारदस्त शरिरयष्टीच्या या वादळी मल्लाने देश-विदेशातील मल्लांना आस्मान दाखवले.
कुस्तीसाठी गाठले कोल्हापूर : पै. मारूती वडार एवढे भारदस्त होते की त्याकाळी सातारा जिल्ह्यात त्यांच्या तोडीचा पैलवानच नव्हता. त्यामुळे आपले कुस्ती कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत सराव करतानाच ते इनामी कुस्त्याही करायचे. तेथूनच त्यांनी हनुमान उडी घेत लंडनपर्यंत धडक मारली. सातासमुद्रापार कुस्तीचा डांका वाजवला. इनामी कुस्त्या जिंकून त्या पैशातून त्यांनी स्वत:च्या खुराकाचा खर्च तर भागवलाच, शिवाय कुटुंबाचा चरितार्थ देखील चालवला.
जागतिक मल्लांच्या वारसा यादीत समावेश : देश-विदेशात त्यांनी नामवंत मल्लांशी कुस्त्या केल्या. त्यामध्ये भुडन चार्ली, बाला रफीक, दारासिंह, पैलवान रंधवा यांच्या सोबतच्या कुस्त्या गाजल्या. त्यांचा लौकीक सातासमुद्रापार पोहचल्यानंतर इंग्लडच्या स्पोर्ट असोसिएशनने त्यांना इंग्लंडला बोलावले. तेथे त्यांनी दोन वर्षे फ्री स्टाईल कुस्त्या केल्या. इंग्लंड, फ्रान्स, न्युझीलंड, पाकिस्तानसह सहा देशांमध्ये मारूती वडार यांनी कुस्त्या केल्या. त्यांनी सलग 36 कुस्त्या जिंकल्या होत्या. या पराक्रमामुळे जागतिक मल्लांच्या वारसा यादीत त्यांचा समावेश करण्यात आला.
सुनील गावसकरांनाही भुरळ : विक्रमादित्य सुनील गावसकर यांना कुस्तीची आवड होती. मारूती वडार यांची भारदस्त शरिरयष्टी आणि कुस्ती कौशल्य पाहून त्यांना देखील भुरळ पडली. मारूती वडार हे मुंबईत कुस्तीसाठी आल्यानंतर सुनील गावसकर स्वत: त्यांना घ्यायला जात असत. तसेच त्यांचे साहित्य ते स्वत: घ्यायचे. सुनील गावसकर यांनी आत्मचरित्रात हा किस्सा लिहिला आहे.
सातार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा : पै. मारूती वडार यांच्या नावाने अर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी वडार समाज बांधवांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्याचा विचार करून शिंदे-फडणवीस सरकारने महामंडळाच्या स्थापनेची घोषणा करून 50 कोटींचा निधी वर्ग केला आहे. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगीरांचा देखील सन्मान झाल्याची भावना पै. मारूती वडार यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.