सातारा - सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोमवारी बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. त्यामुळे वनविभागाची टीम या बिबट्याच्या शोथात होती. अखेर तब्बल साडेतीन तासांच्या सर्च ऑपरेशन नंतर रात्री १२ वाजता ही शोधमोहीम थांबविण्यात आली.
कर्मचाऱ्याला दिसला होता बिबट्या -
सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय सुटल्यानंतर घरी निघालेल्या एका कर्मचाऱ्याने बिबट्या दिसल्याचा दावा केला होता. त्याने याची माहिती कार्यालयाच्या चौकीदाराला दिली. तसेच वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहिम राबवली. वनविभागाच्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी साडेतीन तास जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचा परिसर पिंजून काढला. रात्री सुरू झालेल्या पावसाने या शोध मोहिमेत अडथळे येत होते. मात्र, बिबट्या न मिळाल्याने ही शोधमोहीम थांबवण्यात आली. दरम्यान, या शोधमोहिमेदरम्यान बिबट्याच्या कोणत्याही पाऊलखुणा सापडल्या नसल्याची माहिती वनक्षेत्रपाल डाॅ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली. तसेच सर्व शक्यता गृहीत धरुन शोधमोहीम सुरू ठेवण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - ठाण्यात आता मनसेकडून 'फेरीवाला हटाओ' मोहीम सुरू; पालिकेच्या आवारातील फेरीवाले हटवले