सातारा - जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी काम करणारे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना त्यांच्यागावी सुखरूप पाठवण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सातारा रोडवरून स्पेशल श्रमिक रेल्वे मध्य प्रदेशातील रेवाकडे रवाना झाली.
वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत श्रमिकांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी संजय आसवले, प्रांत मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर उपस्थित होते.
परराज्यातील अडकून पडलेल्या श्रमिकांना विशेष रेल्वेतून सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी रेल्वे मध्य प्रदेश शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर सातारा रोड येथून श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेत 1 हजार 320 श्रमिक असून त्यांना जेवणाचे पार्सल, पिण्याचे पाणी प्रशासनांकडून देण्यात आले आहे. ही रेल्वे बुधवारी दुपारी दीडच्या दरम्यान रेवा येथे पोहचणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ते घरी जायचे म्हणून सगळे श्रमिक आनंदात होते.