सातारा - मुंबईत खासगी कारचालक म्हणून काम करणारी जावळी तालुक्यातील ५४ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. आज त्याचा 22 वर्षांचा मुलगाही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 झाली आहे.
मुळचा जावळी तालुक्यातील कारचालक वाळकेश्वर, मुंबई येथे कामास होता. तो कोरोनाबाधित असल्याने जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे. त्याच्या मुलालाही संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल आज मिळाला. त्यात त्यालाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले.
मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या इतर 5 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सातारा जिल्ह्यातील दोन 29 व 47 वर्षीय नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. काल जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोव्हिड-19 रुग्णाचे निकटसहवासीत म्हणून 12 नागरिकांना तसेच तिघांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कराड येथे चौघांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व 24 जणांचा घशातील स्त्रावाचा नमुना आज पुण्याला पाठविण्यात आला असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
आज सायंकाळ अखेर जिल्ह्यातील 'कोरोना'बाबतची स्थिती -
1. एकूण दाखल - 219
2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 115
3. कृष्णा हॉस्पिटल, कराड- 102
4. खाजगी हॉस्पिटल- 2
5. कोरोना नमुने घेतलेले- 223
6. कोरोनाबाधित अहवाल - 5
7. कोरोना अबाधित अहवाल - 181
8. अहवाल प्रलंबित - 33
9. डिस्चार्ज दिलेले- 181
10. सद्यस्थितीत दाखल- 38