सातारा - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा रोज दोन हजारांहून जास्त वाढत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी आजपासून (दि. 25 मे) सुरू झाली. सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख तपासणी नाक्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत होता.
सहा दिवस कडक निर्बंध
महाराष्ट्रातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा सारख्या लहान जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजारांच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या महिनाभराच्या निर्बंधानंतरही बाधितांची संख्या घटण्याऐवजी वाढताना दिसली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून (मंगळवार) सहा दिवसांसाठी कडक टाळेबंदीचे आदेश काढले.
रस्त्यांवर तुरळक रहदारी
सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर विशेषतः ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल तसेच स्थानिक ग्रामस्थांचे पथक तैनात करण्यात आले आहेत. सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवर तुरळक प्रमाणात रहदारी पाहायला मिळाली. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोक रस्त्यावर उतरले होते. गेल्या महिनाभरापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद होत्या. कडक निर्बंधामध्ये दूध व वैद्यकीय सेवा वगळता सर्व उद्योग, व्यापाराला प्रतिबंध घालण्यात आला आहे.
ग्रामीण भागावर लक्ष
बँकांना सकाळी 10 ते 1 या वेळेत चेक तसेच एटीएमचे कामकाज करण्याची मुभा देण्यात आली आहे. किराणा दुकान, हॉटेल यांच्या घरपोच सेवांवरही या सहा दिवसांत निबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर सर्वाधिक कोविडबाधित असलेले टॉपटेन गावे व सर्वांत कमी कोविड बाधित बॉटमटेन गावांवर लक्ष ठेवून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अशा गावांमधील जास्तीत जास्त नागरिक गृह विलगीकरणात राहण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणात राहून काटेकोर नियम पाळतील, याबाबत उपाय योजना करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार बंसल यांनी सांगितले. ग्रामपंचायत पातळीवर स्थानिक प्रशासनासोबत सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने बॅरेकेटससह इतर उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - बेजबाबदार सातारकरांना तीन महिन्यांत तब्बल ८१ लाखांचा दंड