सातारा - कोरोनामुळे रामनवमी उत्सव सर्वत्र अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. रामाचा गोट येथील काळाराम मंदिरात देखील साध्या पद्धतीने आणि मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी राम नवमीला मंदिरात येऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नसल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मोजक्याच सेवेकऱ्यांची उपस्थिती
पहाटे श्रीरामांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी नित्य पूजा-अर्चा झाली. दुपारी राम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. राम नवमीनिमित्त इतर धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरुपात साजरे होणार असल्याचे काळाराम मंदिरचे विश्वस्त मोहन शहा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
भाविकांचे मंदिराबाहेरूनच दर्शन
कोरोनामुळे निर्बंध असले तरी, राम नवमीच्या उत्सवाच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, म्हणून अनेक भाविक मंदिराबाहेरूनच दर्शन घेताना दिसले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांनी प्रभू श्रीरामांची उपासना घरीच करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले होते. भविकांकडून त्याचे पालन होताना पहायला मिळाले.