सातारा - "जिल्हा बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी मतदान करावे. केवळ जागा अडविण्यासाठी आणि सातारा जिल्हा बँक ही देशातील सहकारातील मोठी संस्था आहे. म्हणून, मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे," अशी टीका भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.
सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकले शड्डू
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकारण रंगले आहे. बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दंड थोपटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व समावेशक पॅनेलमध्ये सहभागी असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आज अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांच्याशी 'सुरूची' या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी संवाद साधला.
'सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनेलचा विजय निश्चित'
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की गेली पाच वर्षे सातारा जिल्हा बँकेत भाऊसाहेब महाराजांच्या नंतर संचालक व अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली पाच वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालले. या निवडणूकीत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे असे मिळून जे पॅनेल होत आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनेलचा विजय होणार आहे.
'उदयनराजेंचा निर्णय पवारसाहेब करतील'
कोणी किती टीका करू देत, कोणी काहीही करू देत, काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलचा विजय होणार आहे. बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच यावेळी सभासदांनी मतदान करावे, असे आवाहन करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की केवळ जागा अडविण्यासाठी आणि जिल्हा बँक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे. उदयनराजेंचा निर्णय खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे करतील, असेही त्यांनी सांगितले.