सातारा - 'गरज सरो अनं वैद्य मरो', ही खासदारांची जुनी सवय असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा साताऱ्यातील नागरिकांना येत आहे, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. ते साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याबरोबर त्यांनी यावेळी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी कसलाही संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजे यांचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरुनते सिध्द होत आहे. हे सर्व साताऱयातील जनतेनेही हे पाहिले आहे. लोकसभा निवडणूकीच्या आधी अगदी नगर पालिकेच्या निवडणूकीवेळीही उदयनराजे यांची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनेतला चांगलेच माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात कसा फरक पडला, हेही जनतेने जवळून पाहिले आहे. लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे. निरा- देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदारसंघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरु असलेले भांडण कशासाठी आहे हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मी सातारा आणि जावळीतील जनतेशी नेहमीच बांधिल राहिलो आहे, यापुढेही कायम राहणार आहे. मी सातारकर आणि माझ्या मतदारसंघातील जनतेमुळेच आहे, हे मी कदापी विसरणार नाही. त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.