सातारा - लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन शरद पवारांनी घडवून आणले होते. याची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. मात्र, काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यावेळी मोठ्या पवारांनी दोन्ही राजेंना एकत्र करून मनोमिलन केले होते. पण शिवेंद्रराजे यांच्या काही कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली असल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कधीच काही खरे नसते याचा अनुभव अनेकदा राजकीय नेते मंडळींना आला आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, पक्षांतर्गत असलेली धुसफूस कायम दिसून येत आहे. उदयनराजेंनी मात्र प्रत्येक पक्षात आपला एक गट निर्माण करून ठेवला आहे. भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे ते कोणाचेच नाहीत आणि सर्वांचेच आहेत, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण त्यांनी केली आहे.
काही दिवसापूर्वी पाटण तसेच सातारा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या व्यासपीठावरसुद्धा उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावून आपली ताकद दाखवून दिली आहे. भरसभेत मुख्यमंत्र्यांसमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत उदयनराजेंची असलेली क्रेझ दाखवून दिली.
त्यामुळे नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर मनोमिलन करायचे व स्थानिक पातळीवर करायचे नाही, असे चालणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. लोकसभेला उदयनराजेंच्या मदतीसाठी शिवेंद्रराजे तयार आहेत. मात्र, विधानसभेला शिवेंद्रबाबांना मदत करणार का? हा प्रश्न शिवेंद्रराजे समर्थक विचारत आहेत.