सातारा - एकनाथ शिंदे यांच्या समवेत स्वतंत्र गट स्थापन करणार्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात आक्रमक शिवसैनिकांनी सातार्यातील पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी 25 शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
शंभूराजेंच्या निवासस्थानासमोरील पोवई नाक्यावर घोषणाबाजी - सातार्यातील पोवई नाक्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे कोयना-दौलत हे निवासस्थान आहे. राज्यातील निर्माण झालेल्या राजकीय तिढ्यानंतर सातारा पोलिसांनी देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानाबाहेर आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविला आहे. शनिवारी दुपारी सातार्यातील शिवसैनिक पोवई नाक्यावर जमा झाले आणि बंडखोरांना माफी नाही, गद्दारांचा निषेध असो, अशी घोषणाबाजी केली.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तात वाढ - मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलने सुरू केल्यानंतर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने एकनाथ शिंदे यांच्या दरे तर्फ तांब येथील निवासस्थानासह गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरील बंदोस्त वाढविला आहे. सातार्यात आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. त्यामुळे पोलीस सतर्क होते. सकाळपासूनच बंदोबस्त वाढविला होता. शिवसैनिक पोवईनाक्यावर जमल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्यासह 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनामुळे काही काळ पोवईनाका परिसरात तणाव निर्माण झाला होता.