सातारा: वाई, लोणंद, फलटण, कोरेगावमध्ये राष्ट्रवादीने तर वडूजमध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या आघाडीने वर्चस्व सिद्ध केले. पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलने १५ जागा जिंकत तब्बल 40 वर्षानंतर सत्तांतर घडवले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पॅनेलला ३ जागा मिळाल्या. शंभूराज देसाई हे कॅबिनेट मंत्री आणि सातारा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पाटण बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
कॉंग्रेसची सत्ता कायम: कराड बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांच्या लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलने 12 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे कार्यकरिणी सदस्य अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवर समाधान मानावे लागले.
उदयनराजेंच्या पॅनेलचा पराभव: सातारा बाजार समिती निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत सर्व १८ जागा जिंकत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या अजिंक्य पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार उदयनराजे भोसले गटाच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. खासदार उदयनराजे भोसले गटाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला.
वाईत राष्ट्रवादी पुन्हा: वाई बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्तारूढ सहकार प्रगती पॅनेलने सर्व ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. यापूर्वी सत्ताधाऱ्यांचे ६ आणि विरोधकांचा १ सदस्य बिनविरोध निवडून आला होता.
फलटणमध्ये राजे गटाचा करिष्मा: फलटण बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व १४ जागांवर मताधिक्याने विजय मिळवत राष्ट्रवादीच्या राजे गटाने आपला करिष्मा दाखवला. यापूर्वी राजे गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. शिवसेना, रासप आणि कॉंग्रेस या विरोधी पक्षांनी एकत्र येत राजे गटापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलाढ्य राजे गटाने सर्व १८ जागा जिंकून विरोधकांना व्हाईट वॉश दिला. विरोधकांचे आव्हान तोकडे पडले.
कोरेगावमध्ये शिंदे गटाचा प्रवेश: कोरेगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने आपली सत्ता राखली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
लोणंदमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल विजयी: लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकून पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले. तर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या भाजप-सेना, काँग्रेस व अन्य पक्षाच्या महायुतीला केवळ एक जागा मिळाली. वाई तालुक्यासह खंडाळ्यात देखील मकरंद पाटलांचे वर्चस्व दिसून आले.
खटाव तालुका विकास आघाडीची बाजी: खटाव तालुक्यातील वडूज बाजार समितीवर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकून आपले वर्चस्व अबाधित राखले. राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलला ५ जागा मिळाल्या.
हेही वाचा: Aaditya Thackeray in Vajramuth Sabha : लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल- आदित्य ठाकरे