सातारा - पुण्याकडून सातारा जिल्ह्यात प्रवेश होत असताना महामार्गावर सारोळा पुलाजवळ उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावरील व्यवस्थेची गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. अजून काही दिवसच हा त्रास सहन करावा लागेल. लवकरच ही परिस्थिती आटोक्यात येईल,' अशी आशा देसाई यांनी या निमित्ताने बोलताना व्यक्त केली.
साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व हद्दींवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. पुणे-सातारा महामार्गावर सातारा जिल्ह्याची हद्द असणाऱ्या सारोळा पुलाजवळ असलेल्या तपासणी ठिकाणाला देसाई यांनी आज भेट दिली. येथील तपासणी ठिकाणाची व बंदोबस्ताची आणि कार्यरत असणाऱ्या पोलीस यंत्रणेची माहिती घेतली.
तपासणी ठिकाणावर पोलीस यंत्रणा 'अलर्ट' असल्याचा शेराही देत पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी या भेटीत दिला. पहाणीनंतर शंभूराजे देसाईंनी खंडाळा विश्रामगृह येथे तालुक्यातील सर्व शासकीय अधिका-यांकडून खंडाळा तालुक्यातील कोरोनांच्या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला