कराड (सातारा) - ट्रॅक्टरच्या धडकेत १४ वर्षांची शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील रेठरे खुर्द गावात घडली. नम्रता आकाराम मोहिते, असे तिचे नाव आहे. ती इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती गावातील मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक मोहन गणपती घोडके (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मैत्रिणीकडे आभ्यासासाठी जाणे बेतले जीवावर
नम्रता गावातील मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जात असताना गावातील बिरोबा मंदीरासमोर उसाचे वाढे भरून रेठरे बुद्रुककडे निघालेल्या ट्रॅक्टरने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा भाऊ अविनाश आकाराम मोहिते याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक मोहन गणपती घोडके याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.