सातारा - कोरोनाच्या सावटाखाली आज(मंगळवार) गुढीपाडवा हा सण साजरा होत आहे. या सणाला साखर गाठीचे विशेष महत्त्व असते. अनेक व्यावसायिक अगदी विदेशातही आपल्या साखर गाठी पाठवत असतात. दरवर्षी विविध देशात आपले मराठी बांधव गुढीला गाठी बांधून सण साजरा करतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे या वर्षी प्रथमच ही साखर गाठी देशाबाहेर गेली नाही, अशी खंत व्यावसायिक शेखर भरत राऊत यांनी व्यक्त केली. लाॅकडाऊनच्या भितीने यंदा कमी उत्पादन केल्याने पाडव्याला साखरगाठीचा तुटवडा जाणवत आहे.
साखरगाठ पाठवण्याची परंपरा -
दरवर्षी मल्हार पेठेतील राऊत यांच्या कारखान्यांमध्ये दोरीला टांगलेल्या हजारो गाठी पाहताक्षणीच एक वेगळेच नववर्षाचे चैतन्य जागृत होताना दिसते. वर्षानुवर्षे मिठाईमध्ये पारंगत असलेल्या राऊत परिवारातर्फे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्री महाकाय आकाराच्या 9, 11 आणि 13 अशा पदकांच्या सुरेख कलाकुसर व सजावट केलेल्या साखर गाठी पाठवल्या जातात. मात्र, कोरोनामुळे मागील वर्षापासून या परंपरेत खंड पडला आहे.
नगरच्या कलाकारांचा गाठी तयार करण्यात हातखंडा -
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखरी गाठी बनवणारे कारखाने आहेत. त्यात राऊत यांचा देखील आहे. त्यांच्या कारखान्यात दरवर्षी नगर जिल्ह्यातून कसबी कलाकार येतात. दीड ते दोन महिने ते हजारो किलोंची साखर गाठी बनवतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे केवळ आठ दिवसातच या साखर गाठ्या बनवून आता हे कलाकार आपल्या गावी परतले आहेत. अगदी दहा रुपयांपासून ते सुमारे हजार रुपयापर्यंत किंमत असणाऱ्या या साखर गाठी दरवर्षी मराठी बांधव गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत मोठ्या उत्साहाने खरेदी करतात. दरवर्षी या पांढर्याशुभ्र, केशरी आणि गुलाबी रंगातील गाठ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असतात.
परदेशातही साखरगाठीला मोठी मागणी -
व्यावसायिक शेखर राऊत यांनी सांगितले, गाठी ही खाण्यास अतिशय गोड असते. साखरेचा पाक साच्यातील दोऱ्यावर टाकून ही गाठी बनते. यावर्षी केवळ ग्राहकांच्या मागणीवरच अतिशय अल्प प्रमाणात या साखर गाठी बनवल्या आहेत. दरवर्षी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, दुबई, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन या ठिकाणी साखर गाठी जातात. तेथील मराठी बांधव परदेशातही गुढी उभारून आनंद साजरा करतात. मात्र, मागील वर्षी केवळ दुबई, अबुधाबी आणि ऑस्ट्रेलियात ही साखर गाठी जाऊ शकली. या वर्षी तर राज्यात आणि राज्याबाहेरही गाठी पाठवणे शक्य झाले नाही, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
25 टक्केच उत्पादन -
किरकोळ विक्रीसाठी या गाठ्या नगावर विकल्या जातात तर, ठोक व किरकोळ विक्रेते किलोवर या गाठ्या खरेदी करतात. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे संपूर्ण व्यवसायाची वाताहात झाली. यावर्षीही कोरोनाच्या अस्थिर परिस्थितीमुळे केवळ २५ टक्केच उत्पादन केल्याचे व्यावसायिक राऊत यांनी सांगितले. कमी उत्पादन घेतल्यामुळे बाजारात गाठींचा तुटवडा जाणवत आहे. यंदाचा पाडव्याचा सण साखरगाठीविनाच करावा लागणार असल्याचे, नागरिक अमोल झंवर यांनी सांगितले.
अंदाज चुकल्याने तुटवडा -
कोरोनामुळे विकेंडचा लाॅकडाऊन, दुकानांची कमी केलेली वेळ यामुळे मालाचा उठाव होणार नाही. या अंदाजाने व्यापा-यांनी साखरगाठीचा माल कमी केला. अंदाज चुकल्याने साता-यात साखर गाठीचा तुटवडा असल्याचे योगेश स्वीट्सचे मालक योगेश मोदी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनी बनवतायत 'रेडीमेड गुढी'..