सातारा - कोरोनाच्या संकटात वैद्यकीय इतर खर्च वाढत असताना सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. या बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना ९ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही जिल्ह्यातील आघाडीची बँक आहे. या बँकेकडून नेहमीच सभासदांना नवनवीन योजना उपलब्ध करून देण्यात येतात. कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत. या परिस्थितीत एक अंकी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, अशी बँकेचे सभासद व बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे व संचालक मंडळाची इच्छा होती. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाच्या बैठकीत सभासदांना 9 टक्के व्याजदराने 5 लाख रुपये आपत्ती निवारण कर्ज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले निर्णय-
सेवानिवृत्त सभासदांनादेखील 2 लाख कर्ज 9 टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकेच्या सभासदांना ओव्हर ड्राफ्ट कर्ज 10 टक्के व्याजदराने मिळणार आहे. त्याची मर्यादा 10 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याबरोबरच बँकेमार्फत सभासदांना व त्याच्या पत्नीला १ लाखापर्यंत आजारपणाची मदत देण्यात येते. त्यामध्ये कोरोना आजाराचाही समावेश करण्यात आला आहे. यापुढे कोरोनाग्रस्त सभासदाला 20 हजार रुपयापर्यंत आजारपणाची मदत मिळणार आहे. याबाबतचे सर्व निर्णय सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने मंजूर केले आहेत.
तसेच बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या इतर कर्जाच्या व्याजदरावरदेखील चर्चा झाली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षक बँकेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून सभासदांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परामणे यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.