सातारा: जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल २० लाख १० हजार रुपये किंमतीचे शंभर मोबाईल सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिकदृष्ट्या शोध लावून परत मिळविले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी ते मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास: गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडतात. अनेकदा लोकांचे मोबाईल हरवतात. अशा घटनांची पोलीस ठाण्यात नोंद होते. मात्र, मोबाईल परत मिळेलच याची खात्री नसते. तरीही एलसीबी आणि सायबर सेलने तब्बल शंभर मोबाईलचा शोध लावला.
तपासाचे आदेश: सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलला केली होती. त्यानुसार पोलिसांनी शंभर मोबाईल्सचा शोध लावण्यात यश मिळविले.
कागदपत्रे तपासून मोबाईल केले परत: मोबाईलच्या मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना शनिवारी दुपारी साताऱ्यातील शिवतेज हॉलमध्ये बोलावून घेण्यात आले होते. त्याठिकाणी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधितांना कागदपत्रे तपासून मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, गहाळ मोबाईलची शोध मोहीम यापुढेही कायम ठेवण्याची सूचना पोलीस अधीक्षकांनी केली आहे.
पोलिसांकडून पर्यटकांची सुटका: पोलीस विभाग अनेकदा उत्कृष्ठ कामगिरी बजावत असते. याचाच प्रत्यय पालघर जिल्ह्यात आला. तांदुळवाडी किल्ल्यावर अडकलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने 19 मार्च, 2019 रोजी सुखरूप सुटका केली होती. हे पर्यटक किल्ल्यावर फिरायला आल्यानंतर पायवाट विसरल्याने भरकटले होते.
पायवाट चुकली अन्: पालघर तालुक्यातील तांदुळवाडी किल्ला तरुणाईला नेहमीच आकर्षित करतो. यामुळेच मुंबई आणि ठाणे येथील २१ तरुण-तरुणी हा किल्ला पाहण्यास आले होते. दिवसभर किल्ल्यावर भ्रमंती केल्यानंतर या सर्व तरुणांनी किल्ला उतरण्यास सुरुवात केली. मात्र, खाली उतरण्याची पायवाट चुकल्याने ते किल्ल्यावरच भटकत राहिले. मात्र, त्यांना पायवाट सापडली नाही. यानंतर अंधार दाटल्याने हे सर्व पर्यटक किल्ल्यावरच अडकले. या भागात बिबटे आणि हिंस्र श्वापदे असल्याने या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. त्यातील काही पर्यटकांनी पालघर पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क साधून मदत मागितली. यानंतर सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप यांनी काही ग्रामस्थ, पोलीस पाटील यांना सोबत घेऊन पर्यटकांना खाली आणण्यास मदत केली.