सातारा : खेडोपाडी, वाडीवस्तीवर तन, मन, धन वेचून शिकणार्या तरूणींमध्ये काही तरी करून दाखवण्याची अनिवार ऊर्मी असते. झपाटलेपणातून आलेले जाणतेपणही असते. या गोष्टी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. कराड-पाटण तालुक्याच्या सीमेवरील डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावातील साक्षी आणि प्रियांका यादव या मुली डोंगराएवढे कष्ट घेऊन शिक्षण घेत आहेत. शिकून त्यांना पोलीस दलात दाखल व्हायचे आहे. त्यांची जिद्द पाहता 'लहरोंके साथ तो कोई भी तैर लेता है पर असली इन्सान वो है जो लहरोंको चिर कर आगे बढता है'! या ओळी सार्थ ठरतात. महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया पाठरवाडीतील सावित्रींच्या या लेकींचा खडतर प्रवास.
शैक्षणिक प्रवास खडतर : आज शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध असल्या तरी दुर्गम भागापर्यंत त्या पोहचलेल्या नाहीत. दुर्गम खोर्यातील मुलींच्या शिक्षणाची वाट आजही खडतर आहे. धरणांचा जलाशय, डोंगरदर्या, नैसर्गिक अडथळे पार करत मुलींना शिक्षण घ्यावे लागत आहे. कराड आणि पाटण तालुक्याच्या हद्दीवर डोंगरावर असलेल्या पाठरवाडी गावातील मुलींच्या शिक्षणाचा प्रवास देखील असाच खडतर आहे. तरीही त्या डगमगलेल्या नाहीत. लहरोंके साथ तो कोई भी तैर लेता है पर असली इन्सान वो है जो लहरोंको चिर कर आगे बढता है! या जिद्दीने साक्षी आणि प्रियांका यादव कराडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.
पोलिस दलात व्हायचंय दाखल! : चांगले शिक्षण घेऊन पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणार्या साक्षी आणि प्रियांका या मुली पाचवीपासूनच डोंगरावरून ये-जा करत शिकत आहेत. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गमेवाडी गावात येऊन सकाळी पहिल्या एसटीने कराडला त्या महाविद्यालयात जातात. गेली आठ वर्षे त्यांची पायपीट सुरू आहे. पारंपारिक शिक्षण आणि केवळ पदवी घेऊन त्यांना थांबायचे नाही तर पोलीस खात्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. कॉलेज संपल्यानंतर रोज कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जाऊन त्या भरतीची तयारी करत आहेत.
आकाशा जाऊ भिडून : शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग, उपक्रम सुरू असतात. त्यातून नव्या वाटा निर्माण होत राहतात. परंतु, पाठरवाडीच्या साक्षी आणि प्रियांका यादव यांच्या शैक्षणिक वाटेत सोयी-सुविधांचा अभाव आणि खाचखळगेच जास्त आहेत. तरीही त्या डगमगल्या नाहीत. 'हातात हात घेऊन, धरतीवर राहू जुडून, आकाशा जाऊ भिडून, या दृढ निश्चयाने ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. खाकी वर्दी हे त्यांचे ध्येय त्यांना खुणावत आहे. त्यासाठी त्या कौटुंबिक परिस्थिती आणि नैसर्गिक संकटांशी संघर्ष करत आहेत.
साडे तीनशे लोकवस्ती : डोंगरावर असलेले जेमतेम साडे तीनशे लोकवस्तीचे पाठरवाडी गाव. गावच्या पश्चिमेला पाटण आणि पुर्वेकडे कराड तालुक्याची हद्द. सध्या हे गाव पाटण विधानसभा मतदार संघात येते. लोकनेते दिवंगत विलासकाका उंडाळकरांनी सर्वात प्रथम या गावाचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सोडवला. पशुपालन आणि दुध विक्री हेच लोकांचे अर्थाजनाचे साधन. शेतीला पाणी नसल्याने संपुर्ण शेती पावसावर अवलंबून. तरी देखील पाठरवाडीतील मुली जिद्दीने शिकत आहेत.
अंगणवाडी आणि चौथीपर्यंत शाळा : पाठरवाडी गावात अंगणवाडी आणि चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. मागील पाच वर्षापर्यंत याठिकाणी दोन शिक्षक होते. मात्र पट कमी झाल्याने एक शिक्षक कमी झाला. एकच शिक्षक चौथीपर्यंतच्या मुलांना शिकवतो. सध्या पहिले ते चौथीपर्यंत केवळ ६ विद्यार्थी आहेत. पट कमी असला तरी प्रशासनाने शाळा बंद केलेली नाही. त्यामुळे गावातील मुलांना शिक्षणाची आस लागून आहे. लहान मुला-मुलींना प्रेरणा ठरणार्या साक्षी आणि प्रियांका चौथीपर्यंत याच शाळेत शिकल्या आहेत. पाचवीपासून त्यांचा डोंगर उतरणे आणि पुन्हा डोंगर चढून घरी येणे, असा प्रवास सुरू झाला.
मुख्य प्रश्न रस्त्याचा : दळणवळणाची सोय ही पाठरवाडी गावाची मुख्य समस्या आहे. डोंगर उंच असल्याने रस्त्याची सोय लवकर होऊ शकली नाही. त्यामुळे आजारी लोक, गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी डोंगरावरून पुर्वी झोळीतून अथवा डोलीतून पायथ्याला आणावे लागायचे. कालांतराने शिद्रुकवाडी (ता. पाटण) बाजूकडून कच्चा रस्ता झाला. मात्र, पाठरवाडीतील शाळकरी मुलींंना त्या रस्त्याच्या कसलाच फायदा नाही. आजही त्यांना डोंगर तुडवतच शिक्षण घ्यावे लागते.
नाम फाऊंडेशनच्या मदतीने केला रस्ता : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. मात्र, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पाठरवाडी गाव दुर्गम आणि विकासापासून वंचितच आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गावासाठी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने कच्चा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, वाहतुकीची वाहने त्यावरून येऊ शकत नाहीत. पाठरवाडी गाव अजुनही दुर्गम आहे. मुला-मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. शिकायची इच्छा असूनही डोंगरातील पायपीटीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. रस्त्याअभावी अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. मात्र, साक्षी आणि प्रियांका या जिद्दीने शिक्षण घेत असल्याचे पाठरवाडीचे पोलीस पाटील सागर यादव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा : Mumbai News: मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही लाजिरवाणी गोष्ट - अजित पवार