सातारा- जिल्ह्यात पाच नगरपंचायतींचा अडीच वर्ष कालावधी उलटल्यानंतर नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दहीवडी, कोरेगाव, लोणंद, पाटण, वडूज या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक येत्या १४ तारखेला होणार असून सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहता राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे.
या ५ नगरपंचायतीमधील सध्याची राजकीय परिस्थिती व नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
दहिवडी- येथे काँग्रेस पक्षाकडे ११ नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५ व १ अपक्ष नगरसेवक आहे. काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी दिलीपराव जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.
वडूज- येथे राष्ट्रवादी पक्षाकडे ५ नगरसेवक, काँग्रेसकडे ५, अपक्षाकडे ४, तर भाजपाकडे ३ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून शाहजी गोडसे व राष्ट्रवादीकडून सुनील गोडसे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
पाटण- येथे नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदासाठी संजय चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी एकमेव अर्ज चव्हाण यांचा आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असून नगराध्यक्षपदाची फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे. याठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे.
कोरेगाव- येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक व काँग्रेसचे ३ असे एकून ११ नगरसेवक आहेत. तर काँग्रेसच्या दुसरा गट किशोर बाचल यांच्याकडे ६ नगरसेवक आहेत. नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून रेश्मा कोकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी आमदार शशिकांत शिंदे व किरण बर्गे यांची युती आहे.
खंडाळा- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दयानंद खंडागळे आणि काँग्रेसकडून प्रल्हादराव खंडागळे यांनी अर्ज दाखल केला आहे. खंडाळा नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा नरुठे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात बंड केल्यामुळे या ठिकाणी मोठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. सध्या याठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगराध्यक्षपद आहे.