सातारा - नगरपालिकेतील घंटागाडी ठेक्याची अनामत रक्कम परत करण्यासाठी सव्वादोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे याला आज (बुधवार) न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.
सातारा नगरपालिकेत 8 जूनला दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव व गणेश टोपे यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात फरार असलेला पालिकेचा आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे काल (मंगळवार) पोलिसांपुढे शरण आला होता. पालिकेतील लाचप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहितीही पोलिसांना घ्यायची आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. कायगुडेच्या अटकेमुळे सातारा पालिका वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.
कचरा उचलण्याच्या ठेक्यातील १५ लाख रुपयांची अनामत रक्कम ठेकेदाराला परत करण्यासाठी या चौघांनी 2 लाख 30 हजार रुपयांची मागणी ठेकेदाराकडे केली होती. ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने 8 जूनला नगरपालिकेत सापळा लावून उपमुख्याधिकारी संचित दुमाळसह दोन आरोग्य निरीक्षकांना पकडले होते.