सातारा - देशी-विदेशी पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या मायणी तलावासह येराळवाडी, कानकात्रे व सुर्याची वाडी तलाव या क्षेत्रास लवकरच 'पक्षी संवर्धन राखीव'चा वैधानिक दर्जा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या हितास कोणतीही बाधा न येता लोकसहभागातून पक्षी संवर्धन व पर्यटन या माध्यमातून शाश्वत विकास साधता येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेट बेन यांनी दिली. मायणी येथे डाॅ. बेन यांनी विविध गावच्या ग्रामस्थांशी प्रातिनिधीक स्वरुपात संवाद साधला. त्यानंतर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या बाबतच्या प्रस्तावाची माहिती दिली.
वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेट बेन माहिती देताना... डाॅ. बेन म्हणाले, 'मायणी पक्षी अभयारण्य या नावाने हे क्षेत्र संबोधले जात होते. मात्र, कागदोपत्री त्याला कोणताही आधार नव्हता. त्यामुळे हे क्षेत्र संरक्षीत होण्याची गरज होती. त्या दृष्टीने मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांच्या सहका-याने प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजूरी मिळेल.' प्रस्तावित मायणी समुह पक्षी संवर्धन राखीवमध्ये मायणीसह परिसरातील कानकात्रे, येरळवाडी व सुर्याची वाडी या तलावांचा समावेश केला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या ठिकाणी पक्षांचे आश्रयस्थान संवर्धित करण्यासाठी आवश्यक निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळू शकेल. या क्षेत्राचे संरक्षण व पर्यटन विकासाच्या दृष्टीने स्थानिकांच्या सहभागातून संयुक्त वनव्यवस्थापन समिती नेमता येईल, असेही डाॅ. बेन यांनी स्पष्ट केले. यावेळी उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा, माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ड्रोंगो या पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.हेही वाचा - 'कास धरणाच्या रखडलेल्या कामासाठी वाढीव ५७ कोटी निधीला अजितदादांची मान्यता'हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे असूनही अद्याप अपूर्ण - डाॅ. हमीद दाभोलकर