सातारा - नातेवाईक महिलेशी असलेले अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किशोर बाळासाहेब कांबळे (वय 31 रा. एल.आय.सी. कॉलनी, शाहूपुरी) याला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत वैभव अनंत गोळे (वय 20, रा. मोरावळे, ता. जावली) यांनी फिर्यादीत दिली होती.
गोळे यांची एका महिलेबरोबर ओळख झाली. त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणेही सुरू होते. या दोघांमधील मोबाईल चॅटिंग लक्षात आल्यानंतर किशोर बाळासाहेब कांबळे व अन्य दोघांनी संगनमत करून वैभव गोळे यांना पोलिसात तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी 50 हजारांची खंडणी उकळली.
पोलिसात तक्रार दिल्याचा केला बनाव -
आरोपींनी तक्रारदाराला शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन तक्रार केल्याचा बनावही केला. तसेच त्यांना चारचाकी गाडीतून नेऊन मारहाण केली. त्यांच्याकडील 5 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. या त्रासाला कंटाळून गोळे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच कांबळेला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे अधिक तपास करत आहेत.