कराड (सातारा) - नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करणार्या पोलिसांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. पोलीस खात्याला दिलासा देऊन पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम सरकार करत आहे. सरकार पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस खात्याला आश्वस्त केले.
सातार्यातील पाटण तालुक्यात मल्हारपेठ येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीचे ई-भूमीपुजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची ऑनलाईन तर सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील हे कार्यक्रमास उपस्थित होते.
पोलीसांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी पोलीस ठाण्याच्या जवळच पोलीस कर्मचार्यांची घरे असणे खूप महत्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांसाठी विभागवार प्रशिक्षण केंद्र असले पाहिजे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलिसांची शारिरीक क्षमता व मनोबल वाढण्यास मदत होते. प्रशिक्षणामुळेच आज महाराष्ट्र पोलीस देशात सर्वोत्तम आहेत. कोयनानगर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
वसाहतीचेही काम वेळेत आणि दर्जेदार करा
मल्हारपेठ हे बाजारपेठेचे महत्वाचे गाव आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस ठाण्याबरोबरच वसाहतीचेही काम वेळेत आणि दर्जेदार करा. पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे राज्यात चांगले काम सुरु आहे. त्यामध्ये सातत्य ठेवा. कोरोना संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू व बाधित झालेल्या पोलिसांसाठी 50 लाखाचे संरक्षण तसेच 55 वर्षावरील पोलीस कर्मचार्यांना फिल्डवर्क न देता कार्यालयातील काम देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सातारा पोलीस दलाने कोरोना काळात उत्कृष्ट काम केले आहे. त्याबद्दल सातारा पोलीस दलाचे मी अभिनंदन करतो. मल्हारपेठ पोलीस ठाणे व वसाहतीला सरकार निधी कमी पडू देणार नाही, अशा शब्दही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
विकासकामांना नेहमीच शासनाचे सहकार्य
मल्हारपेठ हे मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याने मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे अशी सर्वांची अपेक्षा होती. सातारा जिल्ह्यातील विकासकामांना नेहमीच शासनाचे सहकार्य राहिले आहे. येत्या 18 महिन्यात पोलीस ठाणे व वसाहत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. राज्याच्या भौगोलिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये पोलीस विभागाचा मोठा वाटा आहे. पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न शासनाने हाती घेतला आहे. पोलीस विभागासाठी भविष्यात आणखीन चांगले उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
पोलीस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव तयार...
मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे यासाठी मी 1995 पासून प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने आमच्या मागणीला मान्यता देवून पोलीस ठाणे व वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव तयार केला आहे या प्रस्तावालाही मान्यता द्यावी, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केली. तसेच अर्थसंकल्पात पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या निवास्थानासाठी 700 कोटींपेक्षा अधिक तरतूद केली असल्याचेही देसाईंनी सांगितले.