कराड (सातारा) – गतवर्षीच्या पुराच्या आठवणी अजूनही नागरिकांच्या मनात घर करून आहेत. यंदाही पूर येणार असल्याच्या शक्यतेने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पूरस्थिती हाताळणे, शोध-बचाव कार्यासाठी कराड आणि पाटणला ४ रबरी बोटी, २० लाइफ जॅकेट आणि दोरखंड देण्यात आले. कराड आणि पाटण येथे कोयना नदीपात्रात बोट जोडण्याचे व चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कराड आणि पाटण महसूल विभागाच्या ताब्यात साहित्य दिले आहे. त्यानंतर बोटीच्या पुरवठादार कंपनीच्या प्रतिनिधींनी महसूल, नगरपालिका, पोलीस, बिगर सरकारी संस्था, नदीकाठच्या गावातील पोहणारे तरुण आणि बोट क्लब स्वयंसेवकांना नदीपात्रात बोट चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच त्यांना बोटीची तांत्रिक माहिती दिली. एका रबरी बोटीची किंमत साडेपाच लाख रुपये आहे. कराड आणि पाटण तालुक्यालाला एकूण २२ लाखांच्या चार बोटी मिळाल्या आहेत.
यावेळी कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, निवासी नायब तहसीलदार आनंद देवकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील व मंडल अधिकारी महेश पाटील उपस्थित होते.