सातारा - पाटण तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले आहेत. या घटनेमुळे सातारा जिल्हा हादरला आहे. सणबूर (ता. पाटण) येथे ही घटना घडली (Satara Crime News) असून ही आत्महत्या आहे की घातपात, हे स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्नातून विषबाधा अथवा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, ठोस कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. लवकरच चौघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल - अभिजित चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक
ढेबेवाडी खोऱ्यात खळबळ - ढेबेवाडी खोऱ्यातील सणबूर गावात शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आई, वडील, अविवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी, अशा चौघांचे मृतदेह सापडले आहेत. आनंदा पांडुरंग जाधव (७०), पत्नी सुमन जाधव, मुलगा संतोष जाधव आणि विवाहित मुलगी पुष्पा धस, अशी मृतांची नावे आहेत.
सणबूर गावात सन्नाटा -सणबूर गावापासून काही अंतरावर जाधव कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. कुटुंब प्रमुख आनंदा जाधव हे शिक्षक होते. गावापासून काही अंतरावर हे कुटुंब राहत असल्यामुळे हा प्रकार लवकर निदर्शनास आला नाही. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युने सणबूर गाव सुन्न झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरीकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
वैद्यकीय पथकासह पोलीस घटनास्थळी - घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी वैद्यकीय पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून प्राथमिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जाधव कुटूंबीय गावापासून दूर राहत असल्यामुळे हा प्रकार नेमका कोणत्या वेळी घडला? याची देखील तपास सुरू आहे.
हेही वाचा :