सातारा- केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्पायर अवॉर्ड या योजेनेत कोल्हापूर विभागाने नामांकनामध्ये राज्यात व्दितीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे जिल्हा निहाय आकडेवारीत विभागात सातारा प्रथम तर कोल्हापूर दुसऱ्या स्थानावर राहिले.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि NIF (Natinal Innovation Foundation, Gandhinagar, Gujrat, India) यांच्या मार्फत इन्स्पायर अवॉर्ड योजनेचे आयोजन केले जाते. प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, शोध आणि विकास यांची सांगड घालून, त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देणे, समाजोपयोगी साधन निर्मिती करुन दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास प्रेरणा देणे, हे या इन्स्पायर अवॉर्ड योजनेचे उद्दिष्ट आहे.
जिल्हा निहाय नामांकनामध्ये सातारा जिल्हा (२२०३) राज्यात तिसऱ्या क्रमांकावर तर कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागाची आकडेवारी पाहता सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर (१७२२) दुस-या, सांगली (१६९७ ) तृतीय, रत्नागिरी (८३३) चौथ्या तर सिंधुदुर्ग (१७१) पाचव्या क्रमांकावर आहे.
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नामांकन करणे, ही बाब शिक्षण विभागाला अवघडच होती. परंतु हे आव्हाने स्वीकारून जिल्ह्यातील तब्बल २२०३ विद्यार्थ्यांचे नामांकन करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. मागील वर्षी केवळ ९०० विद्यार्थ्यांचे नामांकन झालेले असताना यावर्षी मात्र तोच आकडा अडीच पटीने वाढला आहे.
जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्याने इन्स्पायर अवॉर्ड मध्ये २२०३ विद्यार्थ्यांची नोंदणी करुन नवीन उच्चांक प्रस्थापित केला. अशी प्रतिक्रीया माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.