सातारा - खंडाळा तालुक्यातील लोणी गावच्या हद्दीत गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या मोटरसायकल आणि टेम्पोच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोन मित्र जागीच ठार झाले आहेत. मयूर परमार आणि अजय जाधव (रा. सुरवडी, ता. फलटण), अशी मृत तरूणांची नावे आहेत. त्यांचा तिसरा मित्र महेश जाधव याने दुसर्या दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितल्याने तो अपघातातून बचावला आहे.
पाचगणी ट्रीप ठरली अखेरची - सुरवडी गावातील महेश जाधव, अजय जाधव आणि मयूर परमार हे तिघे मित्र एकाच मोटरसायकलवरून पाचगणीला फिरायला गेले होते. पाचगणी ट्रीपहून ते परत आपल्या गावी निघाले असताना लोणी गावच्या हद्दीतील धोकादायक कॉर्नरवर त्यांच्या मोटरसायकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. मोटरसायकलने टेम्पोच्या मध्यभागी धडक दिल्यानंतर टेम्पोचे चाक अंगावरून गेल्याने मयूर परमार आणि अजय जाधव हे जागीच ठार झाले. दोन्ही मित्रांची पाचगणी ट्रीप अखेरची ठरली.
लिफ्टमुळे तिसरा मित्र बचावला - पाचगणीहून तिघेही मित्र एकाच गाडीवरून परत येत होते. पंढरपूर फाट्यावर आषाढी वारीचा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांना पाहून महेश जाधव हा गाडीवरून उतरला. त्याने दुसर्या दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. मयूर आणि अजय हे दोघे पुढे चालले होते तर महेश पाठीमागून येत होते. लोणी गावच्या हद्दीतील धोकादायक वळणावर मयूर आणि अजय यांच्या दुचाकीची टेम्पोशी धडक झाली आणि दोघेही जागीच ठार झाले. लिफ्ट मागितल्यामुळे महेश हा सुदैवाने बचावला.
एकाच दिवशी दोन भीषण अपघात - आषाढी वारीदिवशी सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका पाहायला मिळाली. माण आणि खंडाळा तालुक्यात झालेल्या दोन भीषण अपघातात तीन जण ठार आणि सात जण जखमी झाले. पंढरपूरकडे निघातलेल्या भाविकांची जीप लोधवडे (ता. माण) येथे पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला आणि जीपमधील सात जण जखमी झाले. त्यानंतर रात्री मोटरसायकल अपघातात दोन मित्र जागीच ठार झाले. खंडाळा तालुक्यात गुरूवारी रात्री आणखी एका अपघातात एक पत्रकार जखमी झाला आहे. जखमी पत्रकाराचे नाव मात्र समजू शकलेले नाही.
हेही वाचा -