सातारा : अलीकडे चारचाकी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढत आहेत. पुण्याहून जतकडे जाताना लघुशंकेसाठी थांबलेल्या तरूणाला धडक देऊन कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. कॅनॉलमधील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून निघालेल्या कारमधील दोन मुलासह पाच जणांना वाचविण्यात खंडाळा आणि भुईंज महामार्ग पोलीसांना यश आले.
खंडाळा पोलिसांची तत्परता : कार कॅनॉलमध्ये कोसळल्याची माहिती मिळताच खंडाळा आणि भुईंज महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील पाचजणांना वाचवले. तसेच कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरूणाला आपल्या जीपमधून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेत अपघातग्रस्त कार कॅनॉलमधील पाण्याच्या प्रवाहाबरोबर तब्बल एक किलोमीटर वाहून गेली होती. क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली.
पाचजण बचावले : अपघातग्रस्त कारचा चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (वय 42 ), श्रीमंत शिंदे (वय 70 ), राजश्री श्रीपती शिंदे (वय 37), संकेत श्रीपती शिंदे (वय 13), संस्कृती श्रीपती शिंदे (वय 8, सर्व रा. अथनी, जि. बेळगाव, सध्या रा. पुणे) हे पाच जण पाण्यात बुडताना बचावले आहेत. दरम्यान, कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या राहुल उबाळे याच्यासह सर्वच अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव हे तपास करीत आहेत.
बंदोबस्तावरील पोलीस ठरले देवदूत : पुण्याहून बेळगावकडे निघालेल्या कारने खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी तरूणाला धडक दिल्यानंतर कार कॅनॉलमध्ये कोसळली. सध्या धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या कॅनॉल तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे कार वाहून जात होती. पोलिसांनी तत्परतेने पाण्यात उड्या मारून कारमधील पाच जणांना वाचवले. त्यामुळे पोलीस देवदूत ठरले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी देखील घटनास्थळी तात्काळ धाव घेतली होती.
हेही वाचा :