कराड (सातारा) - व्हेंटिलेटरचा तुटवडा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांच्या पुढाकाराने संवेदना फाऊंडेशनने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला ५ व्हेंटिलेटर मशिन प्रदान केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या कराड तालुक्यात आहे. कराडमधील कृष्णा हॉस्पिटलसह इतर कोविड रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रूग्ण संख्येमुळे बेड अपुरे पडू लागले आहेत. याशिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरही मोठा तुटवडा आहे. व्हेंटिलेटर अभावी अनेक रूग्ण दगावत आहेत. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर मशिन प्रदान केल्या आहेत.
फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, पर्चेस अधिकारी राजेंद्र संदे, कार्यालयीन अधिक्षक तुषार कदम, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्याकडे व्हेंटिलेटर मशीन सुपूर्द केल्या.
हेही वाचा - पदवी प्रवेशाचे करायचे काय? राज्यातील विद्यापीठांपुढे संभ्रम कायम...