सातारा- स्व. बाळासाहेब देसाई यांच्यानंतर त्यांचे नातू शंभूराज देसाई यांना गृहराज्यमंत्रिपद मिळाले आहे. आजोबानंतर नातवाने त्याच खात्याचे राज्यमंत्रिपद भूषविण्याचा दुर्मिळ योगायोग पाटण तालुका अनुभवत आहे. तसेच राष्ट्रवादीचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यानंतर तब्बल 20 वर्षांनी पाटण तालुक्याला मंत्रिपद मिळाले आहे.
हेही वाचा- 'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'
पाटण तालुका दुर्गम आणि डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात पाटणकर आणि देसाई या नेत्यांच्या गटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. 2004 पर्यंत विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल शेकडोंच्या फरकात असायचा. मात्र, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शंभूराजेंनी विक्रमसिंह पाटणकरांचे पूत्र सत्यजितसिंह पाटणकरांना मोठ्या मताधिक्क्याने पराभूत केले. 1999 पासून शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्यात सामना होत होता. पहिल्याच निवडणुकीत शंभूराज देसाई पराभूत झाले. मात्र, 2004 त्यांनी विक्रमसिंहांचा पराभव केला. नंतर 2009 ला विक्रमसिंह पाटणकर निवडून आले. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांचे वारस म्हणून त्यांचे सुपूत्र सत्यजितसिंह निवडणूक रिंगणात उतरले. परंतु, 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेस शंभूराजेंनी बाजी मारली.
पाटणमध्ये शिवसेनेचे आठ-दहा हजार हक्काचे मतदान पूर्वीपासूनच होते. मात्र, शिवसेनेच्या चिन्हावर लढणारा उमेदवार नव्हता. शंभूराजेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेला हक्काचा आमदार मिळाला. शंभूराजेंचे आजोबा लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची घनिष्ठ मैत्री होती. म्हणूनच 1995 ला लोकनेत्याचे नातू शंभूराजेंच्या शिवसेना प्रवेशावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे स्वत: मरळीच्या साखर कारखान्यावर आले होते. लोकनेत्याचा नातू मंत्री झाला पाहिजे, असे जाहीरपणे सांगत शंभूराजेंना सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले होते. पक्ष प्रवेश, लगेच पदाची घोषणा आणि मंत्रिपद देण्याची घटना एकमेव पाटणमध्येच घडली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळात लोकनेत्यांचे नातू शंभूराजेंना गृह खात्याचे राज्यमंत्रिपद दिल्याने दोन योगायोग जुळून आले आहेत.