कराड (सातारा) : लोणंद येथील सोना अलॉईज कंपनीसह सातार्यातील के नायट्रो ऑक्सिजन कंपनीमध्ये ऑक्सिजन निर्मिती सुरू झाली आहे. पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू रहावेत, म्हणून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्याचे 15 कुशल कर्मचारी पुरवले असून त्यांची ने-आण करण्याची जबाबदारीही कारखान्याने स्वीकारली आहे.
सह्याद्री कारखान्यावर सॅनिटायझरचीही निर्मिती -
गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार सह्याद्री कारखान्याने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात 100 आयसोलेशन आणि 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. त्याचा कोरोनाच्या दुसर्या लाटेतही रूग्णांना फायदा होत आहे. तसेच सह्याद्री कारखान्याने हॅण्ड सॅनिटायझरचेही उत्पादन गतवर्षी सुरू केले आहे.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना या सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.