सातारा - शरद पवार यांनी कुठे कुस्त्या खेळल्या? कुठे लंगोट शिवली? तरीही ते कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष, कुठे बॅटींग आणि बॉलिंग केली? तरीही ते क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. पवारांचे वागणे म्हणजे ‘चीत भी मेरी, और पट भी मेरा’ असे आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केला.
हेही वाचा - आमदार शिवेंद्रसिंहराजे-शशिकांत शिंदे यांच्यात दिलजमाई?
आत्मचरित्रात जे लिहिले तेच विधेयकात
खोत म्हणाले, जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जे लिहिले, तेच कृषिनिती आणि तीन कृषी विधेयकांमध्ये आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने दिल्लीतील आंदोलनावरून केलेल्या टि्वटवर पवार यांनी, सचिनने आपले क्षेत्र सोडून बोलताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला होता. सचिनला शेतकऱ्यांबाबत ज्ञान नसले, तरीही तो जे अन्न खातो त्याची त्याला जान असते, अशा शब्दात खोत यांनी सचिनची पाठराखण केली.
शेतकऱ्यांचे आंदोलन शंकास्पद
खोत म्हणाले, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरू असलेले आंदोलन हे नेमके कोणत्या उद्देशाने सुरू आहे, हे शंकास्पद आहे. जे लोक मोदींना जनाधाराच्या माध्यमातून हरवू शकत नाही, ते शेतकऱ्यांचा बुरखा घेऊन आंदोलनात शिरले आहेत. त्यांना ना शेतकऱ्यांची चिंता, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर शेती उत्पादन पिछाडीवर होते. १९६५ नंतर नवे तंत्रज्ञान आले. अनेक उत्पादने वाढली. आता प्रश्न उत्पादन वाढवण्याचा नव्हे, तर वाढलेले उत्पादन विकण्याचा आहे.
त्यांना हवे अंधाराचे साम्राज्य
मार्केट उपलब्ध करण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हे तीन कृषी विधेयक आणले होते. ७० वर्षांमध्ये जे झाले नाही, ते आता होत आहे. जसे घुबडाला उजेडाची भीती असते, तसेच काही घुबडांना शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करून अंधाराचे साम्राज्य हवे आहे. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे खळ लुटता येईल, असे त्यांना वाटते, असेही खोत यांनी सांगितले.
'ही' मानसिकता घातक
मी सोडून बाकीच्यांना काही कळत नाही. दुसऱ्याला कमी लेखण्याची पद्धत या महाराष्ट्रात काही मंडळींनी अनुभवातून आणली. दिर्घकाळ एखाद्या क्षेत्रात असल्यानंतर सगळेच अधिकार मला मिळालेले आहेत, अशा पद्धतीची मानसिकता या राज्यात रुळत आहे. ती नवनेतृत्वाला हानिकारक आहे, असा चिमटाही त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता काढला.
हेही वाचा - गावठी पिस्तूलासह ३ काडतूसे जप्त, कराडजवळ 'एलसीबी'ची कारवाई