सांगली - महाराष्ट्राचे नेतृत्व आणि शक्ती स्थळ हे शरद पवार आहेत. त्यामुळे शक्ती स्थळावरचं हल्ले केला जातात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी राज ठाकरेंना ( Rohit Patil On Raj Thackeray ) लगावला आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्रातील जनता जातीपातीला कधीच थारा देणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला, ते सांगली मध्ये बोलत होते.
राज ठाकरेंवर रोहित पाटलांचा पलटवार - राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपवर प्रतिउत्तर देताना रोहित पाटील यांनी, हल्ले हे नेहमी शक्तीस्थळावरच केले जातात, असे सांगत शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व देशभर करत आहेत. म्हणूनच महाराष्ट्राचे एक शक्तिस्थळ म्हणूनच त्यांच्यावर टीका केली जाते. पण जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही, असे सांगत राज्यात लोकांना भरकटवायच काम केले जातेय. असा आरोपही रोहित पाटील यांनी केला.
...म्हणून शक्ती स्थळ शरद पवारांवर हल्ला - रोहित पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या विचाराला अभिप्रेत असणारे स्वराज्य घडवले होते, आणि आज त्यांच्याच विचारांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र आपण सर्वांनी घडवणे अपेक्षित आहे. पण पुन्हा एकदा महाराष्ट्राला जातीपातीच्या बेड यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. महाराष्ट्राची भूमी, पुरोगामी भूमी आहे. संतांची भूमी आहे, या भूमीला चांगली शिकवण आहे. त्यामुळे आपल्याला निश्चित विश्वास आहे, अशा शक्तीला महाराष्ट्रातील जनता उत्तर दिल्या शिवाय शांत राहणार नाही. तसेच जे मुद्दे समाजात अशांतता पसरवतात, अशा मुद्यांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही, अशा शब्दात रोहित पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्यांवरील भूमिकेवर बोलताना टीका केली आहे.