सातारा - सातारा-फलटण रोडवर रात्रीच्या वेळी गाडीचा जॅक टाकून वाहन चालकांना लुटणारी टोळी लोणंद पोलीसांनी जेरबंद केली. टोळीतील ५ जणांकडून कोयता, दांडके, मिरची पुड, नायलॉनची दोरी, स्क्रु ड्रायव्हर, रॉड वगैरे हत्यारे जप्त केली आहेत.
पोलिसांची पाळत...
लोणंद पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत सातारा-फलटण रोडवर प्रसाद स्टोन क्रशरजवळ निर्जन असणारे मिरगांव खिंडीत काही दिवसांपासून ट्रक चालकांना रस्त्यात लाल रंगाचा जॅक ठेवून, आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार घडत होते. या गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, उपनिरीक्षक गणेश माने व सहकारी गेल्या एक महिन्यापासून सातारा-फलटण जाणाऱ्या रोडवर गस्त घालून घडलेल्या घटनेबाबत गोपनीय माहिती काढली.
पोलिसांची चाहूल लागताच...
११ फेब्रुवारी रोजी रात्री सातारा-फलटण रोडजवळील पुनर्वसन येथे लाल जॅक व काही संशयित व्यक्तींची माहिती मिळाली. लोणंद पोलीसांनी त्या अनुशंगाने लाल जॅक असलेल्या ठिकाणी सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाठलाग करुन जेरबंद करण्यात आले. दरोड्याच्या तयारीतील रामदास बापु काळे, पिंटु शहाजी काळे, दशरथ लक्ष्मण काळे, तानाजी अशोक काळे, सचिन अशोक काळे (सर्व रा. पारा ता. वाशी जि.उस्मानाबाद) यांना अटक केली.
'यासाठी' आले होते संशयित...
हे संशयित ऊसतोडी करण्यासाठी आलेले असून, दिवसभर काम करुन रात्रीच्या वेळी अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सरसावाले होते. संशयितांकडून कोयता, दांडके, मिरची पुड, नायलॉनची दोरी, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी रॉड अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या अशाप्रकारच्या कृत्यामुळे वाहन चालक व प्रवाशांत भितीचे वातावरण होते. लोणंद पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.