सातारा - दुष्काळी भागातील तलावातील माती आज सोन्याच्या भावाने विकली जात आहे. १०० ब्रास रॉयल्टी भरून वीटभट्टी मालक १० ते १२ हजार ब्रास माती उचलून घेऊन जात आहेत. या प्रकरणात माती विकणारे दुसरे तिसरे कोणी नसून माण महसूल विभागाचे कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरीही याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत आहेत.
दुष्काळी भागात शेतकरी वर्गाला खायला अन्न तर जनावरांना चार देखील नीटसा उपलब्ध होत नाही. तर माती भरणार कुठून? मात्र वीटभट्टी चालक महसूलमधील तलाठी आणि सर्कल अधिकारी यांना हाताशी धरुन हे नसते उद्योग करत सुटले आहेत. याप्रकरणी तहसीलदार बाई माने यांनी कारवाई करू, असे सांगून देखील ३ महिने झाले तरी कोणतीच कारवाई केलेली नाही. याप्रकरणी ना वीटभट्टीवाल्यांचे पंचनामे झाले, ना तलावातील उत्खननाच पंचनामे झाले. मग यावरती लक्ष देणार तरी कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
अनेकवेळा नागरिकांच्या तक्रारीवरुन तलाठी गाडे हे २ दिवस माती उपसा बंद करण्यास सांगत आहेत. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा माती उपसा सुरू करत आहेत. त्यामुळे यात नक्की कोणाचा महसूल भरला जातोय? अधिकाऱ्यांचा की माण महसूल विभागाचा? हे कळायला मार्ग नाही. जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन तलाठी, सर्कल आणि महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करुन वीट भट्टी मालकांवरती गुन्हे दाखल करुन त्यांची वाहने जप्त करणे गरजेचे आहे, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.