सातारा - रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी अटकेत असलेला प्रशांत सावंत हा समर्थ हाॅस्पीटलमधील रुग्णांना देण्यात येणारी इंजेक्शन हुशारीने चोरुन विकत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शनचे १२ वायल हस्तगत केल्या असून यामध्ये रुग्णालयातील काहीजण त्याला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमवारी सावंत दाम्पत्य सापडले होते -
पोलिसांनी सांगितले कि, पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री शहरातील समर्थ मंदिर परिसरात प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जाताना पकडले होते. त्यानंतर याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करीत आहेत.
माहिती देताना सहाय्यक अधीक्षक आंचल दलाल 5 ते 40 हजारांना विकले इंजेक्शन -या तपासादरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री केली आहे, असे निष्पन्न झाले. यामध्ये सौरभ प्रकाश पवार (रा. खेड, सातारा) याने प्रशांत सावंत व सपना सावंत यांना रेमडेसिवीर इंजेक्शन वायल विक्री करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली होती. तर याप्रकरणात आतापर्यंत पवार याच्याकडून ९ इंजेक्शन्स वायल जप्त करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण १२ इंजेक्शन वायल जप्त केल्या आहेत. याची किंमत ३५ हजार ४८० रुपये आहे. नगर, सोलापूर, पुणे ग्रामीण आणि काही साता-यातील लोकांना यांनी रेमडीसिवीर इंजेक्शन वायल किमान 5 व जास्तीजास्त 40 हजारांना एक इंजेक्शन विकल्याचे तपासात स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
असा करायचा इंजेक्शनची अफरातफर -
पोलिसांच्या तपासात प्रशांत सावंत हा समर्थ हाॅस्पिटलमध्ये नोकरी करतो. तेथे सर्जिकल वॉर्डचा तो इनचार्ज आहे. तो दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक तसेच रुग्णालयाकडून मिळालेली रेमडेसिवीरची ६ इंजेक्शन ताब्यात घ्यायचा. इंजेक्शनची वायल १०० एमएलची असते. पहिल्या दिवशी रुग्णाला दोन इंजेक्शन दिली जातात. पण, सावंत हा रुग्णाला एक देऊन दुसरी स्पेअर करुन ती घरी नेऊन ठेवत होता. त्यानंतर रुग्णाला उर्वरित देण्यात येणाऱ्या ४ रेमडेसिवीर इंजेक्शन वायल एक दिवसाआड देऊन २ स्पेअर करीत असे. तसेच यामध्ये समर्थ हाॅस्पिटलमधील काही स्टाफ सावंतला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.