सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी माघार घेतली आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासह एकूण सातजण आहेत. जाधव यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाठींबा देण्याचे निश्चित केले आहे.
विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. येथील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले आहे. आठ उमेदवारी अर्जांपैकी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतला.
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग; बैलगाडा शर्यतीच्या आयोजकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
उदयनराजे, श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत खंडाईत, अपक्ष बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले, दीपक उर्फ व्यंकटेश्वर महास्वामी, शिवाजी जाधव, शिवाजी भोसले असे सातजण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.