सातारा - होम आयसोलेशन बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर साताऱ्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 'होम आयसोलेशनमध्ये उपचाराबरोबरच मानसिक आधार मिळतो. रुग्णालयाच्या बिलाचे टेन्शन राहत नाही. सोय असलेल्या आणि सौम्य लक्षाच्या रूग्णांना निवडीचे स्वातंत्र्य मिळावे. सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा', अशा अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहेत.
'आजारापेक्षा टेन्शन खर्चाचे'
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. यात साताऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील होम आयसोलेशन 100 टक्के बंद करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. या निर्णयावर साताऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्यंकटपुरा पेठेतील अजया करंबेळकर म्हणाल्या, "आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर उपचाराचा खर्च किती येणार? याचे टेन्शन असते. आजारापेक्षा खर्चाचा मुद्दा रुग्ण व कुटुंबीयांना अधिक सतावतो. शक्य असेल तर कुटुंबात राहून बरं व्हायला नक्कीच मदत होते".
'घरचे जेवण रुग्णाला कसे मिळणार?'
'कोरोना रुग्णाने आहार योग्य घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार घरून रुग्णाला जेवणाचा डब्बा आपण पाठवतो. तो बऱ्याच ठिकाणी रुग्णापर्यंत पोहोचतो हे समजून येत नाही. पुरेशा डायट अभावी रुग्णांना अशक्तपणा येऊ शकतो. परिणामी मृत्यू होऊ शकतो. असेही प्रकार कानावर येतात. अशावेळी गृह विलगीकरण हाच एक चांगला पर्याय वाटतो", असे भालचंद्र करंबेळकर यांनी म्हटले आहे.
'...तर रुग्णालयाच्या दारात बेडसाठी लागतील रांगा'
"अधिक गरजेच्या रुग्णाला बेड उपलब्ध व्हावा यासाठी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला गरज नसेल तर होम आयसोलेशन हा पर्याय निवडणे अधिक चांगले. नाहीतर बेडसाठी रुग्णालयाच्या दारात रांगा लागतील", असे परखड मत संकेत कुलकर्णी या युवकाने व्यक्त केले आहे.
'मोफत उपचार कराल तर स्वागत'
'शासनाने कोरोनावरील सर्व उपचार मोफत करण्याचा निर्णय घ्यावा. तेव्हा कुठे लोक नि:संकोच रुग्णालयात भरती होतील. तरच होम आयसोलेशन बंद करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असेल', अशी कळकळ समीर थोरात यांनी व्यक्त केली.
'सरकारने पुन्हा विचार करावा'
'कोविड सेंटरमध्ये गंभीर रुग्णांना होणाऱ्या त्रासाचा विपरीत परिणाम इतर रुग्णांवर होतो. त्यामुळे घरगुती वातावरणात रुग्णाला जास्त बरे वाटते. म्हणून सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा', असे मत वैदेही करंबेळकर यांनी मांडले आहे.
'शासनाकडे पुरेसे बेड, मनुष्यबळ आहे का?'
दरम्यान, होम आयसोलेशन बंद करताना संभाव्य रुग्णसंख्येला पुरेसे ठरतील इतके बेड, आरोग्य कर्मचारी स्टाफ, डॉक्टर शासनाकडे उपलब्ध आहेत का? याचा विचार करून तारतम्याने निर्णय घ्यावा', अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रावर शोककळा, सेवा संपण्याच्या 15 दिवस आधीच गोंदियातील जवान प्रमोद कापगते शहीद