सातारा - उदयनराजेंना आवरा अन्यथा, पक्षातून बाहेर पडू, असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना दिला आहे. नीरा देवघरच्या पाण्यावरुन साताऱ्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन राजे विरुद्ध राजे असा संघर्ष पेटला असून, ऐकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी पक्षाध्यक्ष खुद्द शरद पवारांनाच इशारा दिल्याने पवार आता यावर काय भूमिका घेतात ते पाहणे गरजेचे आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रामराजेंनी खासदार उदयनराजेंसह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. साताऱ्यातील ३ पिसाळलेली कुत्री जोपर्यंत राजकीय क्षितीजावर आहेत, तोपर्यंत आपणही पिसाळलेले राजकारण करू असा इशाराच रामराजेंनी दिला आहे. रामराजेंच्या या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.