सातारा - उद्धव ठाकरे सरकार 2 लाखांहून अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकर्यांवर अन्याय करत आहे. त्यांचाही सातबारा कोरा करण्याची गरज आहे. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न केल्यास आम्ही सरकारचा सातबारा कोरा करू, असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. तसेच ठाकरे विचार सोडून वागणार असतील तर त्यांच्या महाविकास आघाडीची माती झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नागरिक सुधारणा विधेयक केंद्र सरकारने संमत केले आहे. मात्र, या विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेस दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आठवलेंनी केला. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - साताऱ्यात राजीनामास्त्र; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मंत्रिपदावरून अनेक दिग्गज नाराज
यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने आतापर्यंत 2 लाखापर्यंत कर्ज घेणार्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. मात्र, ज्या शेतकर्यांनी 2 लाखांहून अधिक कर्ज घेतले आहे. त्या शेतकर्यांवर अन्याय होत आहे. त्यांचाही सातबारा कोरा करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली आहे. सत्तेसाठी शिवसेना गुलामगिरी करत आहे, असेही ते म्हणाले. तसेच वाघासारखी डरकाळ्या फोडणारी शिवसेना आता बकरीसारखी झाली आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्रात नागरिकत्व विधेयकाची आता महाराष्ट्रात अंमलबजावणी न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसघोर हे सरकार हाकलून देणार नाहीत. सध्या संसदेत नागरिकत्व कायदा पास केला आहे. मात्र, या कायद्याने मुस्लीम समाजाची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. युवकांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोप आठवलेंनी केला.
हेही वाचा - बाळासाहेबांच्या रूपाने कराड उत्तरला 30 वर्षांनी मंत्रीपद; सहकार खाते मिळणार?
2014 नंतर आफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून या देशात आले. त्या मुस्लिमाच्या संबंधित हा कायदा आहे. अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध, सिख, इसाई, पारसी आणि जैन त्यांना नागरिकत्व देण्याबाबतचा हा कायदा आहे. काँग्रेस सरकारला गेल्या 5 वर्षात तीव्र आंदोलन करण्याची संधीच मिळाली नाही. ती नागरिकत्व कायद्यामुळे मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस मुस्लिम समाजाला पुढे करून आंदोलन करू पाहत आहे.