सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे दहा वर्षानंतर संपूर्ण माणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला आलेल्या पुरामुळे शनिवारी पहाटे देवापूर नजिकचा राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
राजेवाडी तलाव २०११ पासून होता कोरडा ठाक
२०१० मध्ये पावसाने या तलावात जेमतेम १४ फूट पाणी होते. त्याचा सिंचनासाठीही उपयोग होत नव्हता. तेव्हापासून पावसाची साथ न मिळाल्याने हा तलाव बऱ्यापैकी कोरडा ठाक होता. ही दुष्काळी अवस्था गेली दहा वर्षे या परिसरातल्या लोकांनी सोसलेली आहे. पण यंदाच्या पावसाने चांगली हजेरी लावली असून माण तालुक्यातील पूर्व टोकाचा राजेवाडी तलाव पूर्णत: भरला आहे.
हेही वाचा... साताऱ्यात अशीही एक प्रथा, मेढरांना रंगरंगोटी करुन मिरवणूक
तीन टीएमसी क्षमतेच्या या तलावाचा विस्तार लांबीने वीस किलोमीटर तर रुंदीने नऊ किलोमीटर इतका आहे. हा तलाव भरून वाहिल्याने या भागातला दुष्काळ हटण्यास हमखास मदत झाली आहे. राजेवाडी तलावातून सांगली जिल्ह्यातील दिघंची गावातून पुढे सोलापूर जिह्यातील सांगोला खवासपूर, लोटेवाडी भागातून माण नदी मार्गस्थ होते.
हेही वाचा... 'साहेबांचं कार्य लई मोठ्ठं.. साऱ्या महाराष्ट्राच्या मनातला रणझुंजार नेता'
ऐतिहासिक माण नदी
माण नदीच्या पुराने औरंगजेबाचा दात तोडला व गुडघाही फोडला... औरंगजेब महाराष्ट्रात २७ वर्ष होता. १३ वर्ष म्हसवड पासून १२ ते ४५ मैल एवढ्या अंतरावर खवसपूर, ब्रम्हपुरी, अकलूग येथे होता. १ ऑक्टो़बर १७०० रोजी माण नदीला अचानक महापूर आला. छावणीची वाताहत झाली. औरंगजेब माण नदीच्या पुराच्या पाण्यातून निघताना खडकावर आपटला. त्याचे गुडघे मोडले व पुढचे दात पडल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश राजवटीत माण देशात आसमानी दुष्काळाचे संकट आले होते. या नंतर भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर प्रभावशाली उपाययोजना करण्यासाठी राणी व्हिक्टोरिया यांनी राजेवाडी या मातीच्या भरावाच्या तलावाचे काम सुरू केले, तब्बल तीन वर्षे या तलावाचे काम सुरु राहिले. तीन टीएमसी क्षमतेचा तलाव बांधून पूर्ण केला गेला. या तलावाचे वैशिष्य असे तलावाचे पाणलोट क्षेत्र साताऱ्यातील माण तालुक्यात बंधारा सांगली जिल्ह्यात तर सिंचन लाभ क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात, असा तिहेरी संगम योगायोगाने झालेला पाहावयास मिळतो. राणी व्हिक्टोरिया यांनी स्वत: वेळोवेळी या तलावला भेटी दिलेल्या असून मुक्कामीही राहिलेल्या आहेत. या तलाव परिसरातील बांधकाम केलेले निवासस्थान रेस्ट हाऊसची पडलेल्या स्थितीतील दगडी इमारत आजही या इतिहासाची साक्ष देत आहे.