सातारा : कराडमधील शिवडी गावामध्ये पुणे-बंगळुरू महामार्गावर शनिवारी संध्याकाळी बस अपघात झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, मांड नदीच्या पुलावरील धोकादायक वळणावर सांगली-महाबळेश्वर एसटी बस पलटी झाली. या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर उंब्रजमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघातात धनश्री संदीप जगताप, धनश्री संजय काटे (रा. उंब्रज, ता. कराड), आकांक्षा दादासो पाटील, आरती रामचंद्र पाटील (रा. नानेगाव बुद्रुक, ता. पाटण), स्वाती अरविंद गायकवाड, बबन भगवान पाटील (रा. सातारा), हणमंत रामचंद्र गोरे (रा. चोरे, ता. कराड), लता कृष्णराव लोखंडे (रा. कोल्हापूर), जगन्नाथ विष्णू जांभळे (रा. शिवडे, ता. कराड) यांच्यासह 25 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी काहीजण गंभीर जखमी असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.
सांगली-महाबळेश्वर एसटी (एम. एच. 14 बी. टी. 490) ही बस कराड आगारातून निघाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कराड तालुक्यातील शिवडे जवळ आल्यानंतर एका ट्रकने एसटीला हुलकावणी दिली. त्यामुळे ही बस मांड नदीच्या पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. एसटीची पुढील दोन चाके तुटून पडली होती. अपघातानंतर शिवडे आणि उंब्रजमधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उंब्रजमधील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यात दाखल केले.
हेही वाचा : खेड-शिवापूर टोलनाका बंद करावा, सुप्रिया सुळेंची गडकरींना विनंती