सातारा : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former Chief Minister Prithviraj Chavan ) यांच्यावर गुजरात निवडणुकीत (Gujarat Elections ) मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचारासह बडोदा आणि अहमदाबाद विभागाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण पुढील चार दिवस अहमदाबाद दौऱ्यावर : पृथ्वीराज चव्हाण तेथे राज्य, जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली. अहमदाबाद काँग्रेस कमिटीत त्यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
मागील निवडणुकीत भाजपला टक्कर : गुजरात विधानसभेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजप शला काँग्रेसने चांगली टक्कर दिली होती. यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी काँग्रेसने महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिक यांचा समावेश आहे.
२००४ मध्ये बारा खासदार विजयी : गुजरातचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २००४ मध्ये १२ खासदार निवडून आले होते. गुजरातमधील खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस पक्ष त्यावेळी लोकसभेत नंबर एकचा पक्ष ठरला होता. तसेच मित्र पक्षांच्या साहाय्याने कॉंग्रेस पक्ष सत्तेवरही आला होता. त्यामुळेच गुजरात निवडणुकीसाठी पक्ष नेतृत्वाने पृथ्वीराज चव्हाणांवर प्रमुख विभागांची जबाबदारी सोपवली आहे.