सातारा - राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदार संघातील सरपंचांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी चव्हाण यांनी सरपंचांकडून गावांतील सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला.
शासनाने सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात एक विशेष समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे कामकाज कशा पध्दतीने सुरू आहे, याचीही माहिती चव्हाण यांनी सरपंचांकडून घेतली. शासनाच्या सुरू असणार्या योजनांची सखोल माहिती त्यांनी सरपंचांना दिली. ज्या लोकांकडे दारिद्य्र रेषेखालील कार्ड आहे. त्यांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे. तसेच उज्वला योजनेमार्फत 3 महिन्यात गॅसच्या तीन टाक्याही मोफत मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारच्या योजनांच्या आपापल्या गावांतील लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी सरपंचांनी लक्ष द्यावे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या संदर्भात ग्रामस्थांमध्ये जागृती करणारे उपक्रम ग्रामपंचायतींनी राबवावेत, अशा सूचनाही चव्हाण यांनी सरपंचांना दिल्या.