सातारा - कोरोना संसर्गाच्या भीतीने सुमारे सहा हजार पुणे, मुंबईकर चाकरमानी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना घरातच थांबण्याचे आवाहन केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध गावांना गुरूवारी भेटी दिल्या. उंडाळे खोऱ्यातील येणपे, चोरमारवाडी, सवादे, येळगव या गावांचा त्यांनी दौरा केला. प्रत्येक गावात जाऊन जीपवरील लाऊड स्पीकरवरून ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते. आपल्या भागात आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. चोवीस तास घरात बसणे अवघड असले, तरी कारोनासारखे भयानक संकट रोखण्यासाठी संसर्ग टाळण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे याचाही अवलंब ग्रामस्थांनी करावा, असे चव्हाण यांनी सांगितले.
प्रत्येकाने आपल्या घरातच रहा, स्वतःची काळजी घ्या. शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करुन दिले आहे. जनधनच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. अन्नधान्याची महाराष्ट्रात कोठेही टंचाई नाही. लोकांनी विनाकारण धान्य साठवू नये शिवाय ते खरेदी करण्यासाठी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन चव्हाण यांनी नागरिकांना केले.