कराड (सातारा) - पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्याने महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनियुक्त आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण हे यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येणे शक्य झाले. आजपर्यंत शिक्षक मतदार संघातून जे प्रतिनिधी निवडून जात होते, त्यांच्यापेक्षा प्रा. आसगावकर हे चांगले काम करतील, असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसचा आमदार म्हणून पक्ष प्रा. आसगावकरांच्या पाठिशी असेल. सभागृहात प्रा. आसगावकरांकडून मांडल्या जाणार्या शिक्षकांच्या प्रश्नांना महाविकास आघाडी सरकार नक्की न्याय देईल. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकत्रित प्रयोग राज्यभर यशस्वी झाला आहे, असेही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा - औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे - रामदास आठवले