सातारा - आपले राज्य पुन्हा पेशवाईच्या हातात गेल्यास स्वातंत्र्यापूर्वीची वर्णाश्रम व्यवस्था यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने मतदान करा. अनेकांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे सत्ताधार्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीला ही मंडळी बळी पडली. त्यांचा विचार करू नका. आपण आपले भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ निघालेल्या दौऱ्यात बोलत होते.
हेही वाचा - सत्तेत असताना युवकांसाठी किती रोजगार आणले? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल
यावेळी ते म्हणाले, की मी मुख्यमंत्री असताना विरोधी आमदारांची कधीही विकास कामांबाबत अडवणूक केली नाही. त्यामुळे गेल्या 5 वर्षात मी शिफारस केलेल्या कामांना बाजूला ठेवले गेले नाही. मला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींचा विकास करता आला. मतदारसंघातील ही विकासाची घडी आणखी चांगली बसवण्यासाठी मला आशीर्वाद द्या. गावपातळीवरील आप-आपसातील मतभेद बाजूला ठेवून तुमच्या सर्वांगीण विकासाकरता श्रीनिवास पाटील आणि मला साथ द्या, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
हेही वाचा - उदयनराजेंनी जनतेचा विश्वासघात केला; श्रीनिवास पाटील यांचे टीकास्त्र
आमदार निधीपेक्षा मी कितीतरी जादा पटीने विकासकामे आणली. विधानसभेत त्या ताकदीचा प्रतिनिधी असला, तर हे शक्य आहे. कराड दक्षिणेतील जनतेच्या आशीर्वादामुळे मला खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या पायऱ्या चढता आल्या. हे मी कधीही विसरणार नाही. माझ्याकडून विकासकामांच्या बाबतीत कधीच राजकारण होत नाही. येथून पुढेही ते होणार नाही. तुम्हीही विकासाबाबत कधीही माझ्याकडे या, त्यासाठी माझी कायम मदत राहील, असेही त्यांनी सांगितले.