कराड (सातारा) - भुजंग प्रकटणार असे सांगत पकडलेला नाग मंदिरातील पिंडीवर ठेवणार्या पुजार्याला वनविभागाने अटक केली आहे. पाटण तालुक्यातील ठोमसे गावात ही घटना घडली. गुरुनाथ यशवंत गुरव (रा. ताईचीवाडी, ता.पाटण), असे अटक करण्यात आलेल्या पूजार्याचे नाव आहे.
नेमके काय घडले?
ठोमसे येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा पूजारी गुरुनाथ गुरव याने भुजंगाच्या रुपात नाग प्रकटणार असल्याचे भाविकांना सांगितले. यानंतर गावातील रहिवासी तानाजी साळुंखे यांना पूजेचे साहित्य आणायला सांगितले. देवाची आरती सुरू असताना गुरूनाथ गुरव याने भाविकांच्या नकळत नाग जातीचा सर्प पिंडीवर ठेवला. पिंडीवर नाग प्रकट झाल्याची माहिती परिसरात समजताच आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. पिंडीवर भुजंग प्रकटल्याने मंदिराच्या पूजार्याबद्दल भाविकांमध्ये सहानभुती निर्माण झाली.
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल -
या घटनेची वनविभागाच्या कर्मचार्यांना मिळाली. वनपाल संजय भाट, वनरक्षक रोहित गुरव, विलास वाघमारे, वनसेवक महादेव कदम यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता तो नाग मंदिरातील घुमटात बंदिस्त करुन ठेवल्याचे निशर्दनास आले.
मल्हारपेठ येथील सर्पमित्र विकास पानस्कर यांच्या मदतीने या नागास पकडण्यात आले. त्याची तपासणी केली असता हा नाग पकडून आणलेला असून त्याचे विषारी दातही काढले असल्याचे आढळले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांनी गुरुनाथ गुरव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.