सातारा- केरळात मान्सून आगमन झाले असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्या अगोदर आज सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी रात्री दुष्काळी माण तालुक्यातील वावरहिरे, मलवडी, शिंदी तर पहाटे सातारा शहरात एक तास पावसाने हजेरी लावली.
रविवारी सुर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाल्यानंतर दुपारी पुसेगाव, रहिमतपूर, कोरेगाव, फलटण, बिजवडी या भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, अशा अनेक मोठ्या पावसाची गरज जिल्ह्याला आहे.
जिल्ह्यात वाळवाचा एकही मोठा पाऊस झाला नसल्याने दुष्काळी भागातील पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. माण, फलटण, खटाव, कोरेगाव या भागात ४३ चारा छावण्या तर १५३ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा चालू आहे. त्यामुळे जिल्ह्याला मोठ्या पावसाची गरज आहे.